मुंबई : नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. यामुळे सध्या नाशिकमध्ये मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. या वादात अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी उडी घेतली होती. त्यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षांची कत्तल करण्यास विरोध गेला होता. मात्र, या सगळ्यानंतरही राज्य सरकार साधूग्राम उभारण्यासाठी तपोवनातील झाडे कापण्याच्या निर्णयावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सयाजी शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.
तपोवनातील आंदोलनासाठी ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिल्या त्यापैकी राज ठाकरे एक आहेत. राज ठाकरेंची मी आज भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. झाडं कशी वाचली पाहिजेत याबाबत चर्चा केली. वेगळी झाडं वगैरे लावता येत नाही. १५ फुटांची झाडं वगैरे काही अर्थ नाही. ज्या ठिकाणी झाडं आलीच नाहीत तिथे १५ फुटांची झाडं कशी लागणार? मुद्दा असलेल्या झाडांचा आहे ती झाडं का तोडायची आहेत? ती झाडं तोडायची नाहीत हाच मुद्दा आहे.
दरम्यान मी ठाकरेंचीही भेट मी घेणार आहे. ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांची आम्ही भेट घेणार आहोत. सरकार काही दुश्मन नाही. पण आमची भूमिका काय हे सरकारला समजलं पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे. अजित पवारांनी मला पाठिंबा दिला याचा मला आनंद आहे. तसंच सगळ्याच कलाकारांचीही भूमिका आहे की झाडं वाचली पाहिजे. कुणाला वाटतं का की झाडं तोडली पाहिजे? कुणालाच वाटत नाही. वेळ पडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे असंही सयाजी शिंदे म्हणाले.